लहानपणी वाचलेली आणि आज आंतरजालावर सापडलेली कथा.....:)
Strictly NOT for weak hearts :)
रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. बाहेरची रहदारी मंदावली होती. वसुंधराताईंनी हातातील कादंबरी मिटली आणि व्हरांड्याकडे नजर टाकली. संध्याकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. आताही पावसाची मोठ्ठी सर आली होती. व्हरांड्यातील दिव्याच्या मंद प्रकाशात संगमरवरी जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आजूबाजूच्या निरव शांततेचा भंग करत होते. वसुंधराताईंनी एक सुस्कारा सोडला. त्या आरामखुर्चीतून उठायला जाणार एवढ्यात कोणीतरी दारावरची बेल वाजवली. "कोण असेल बरं इतक्या रात्री?" असा विचार करत त्या दरवाज्यापाशी आल्या. पुन्हा बेल वाजली. वसुंधराताईंनी पीप-होलला डोळा लावून बाहेर पाहिले. दाराबाहेर रीमा ओलीचिंब होऊन थरथरत उभी होती. तिला दारापलीकडे वसुंधराताईंची चाहूल लागली तशी ती ओरडून म्हणाली,"आई! दरवाजा उघड लवकर. प्लीज लवकर कर." तिच्या आवाजात अजिजी होती. वसुंधराताईंचा हात कडीवर गेला आणि तेथेच थबकला. क्षणभराने निर्विकारपणे त्या माघारी फिरल्या. बाहेरून रीमा बेल वाजवत होती. दरवाजाही ठोठावत होती. "आई! उघड ना गं दार, असं काय करत्येस? आई मी रीमा, आई गं! ए आई उघड ना गं दरवाजा!" रीमा काकुळतीने आईला सांगत होती. वसुंधराताईंनी शांतपणे दिवा मालवला, जसे काहीच घडले नव्हते आणि त्या झोपायच्या खोलीत जायला वळल्या.
घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. वसुंधराताई खाडकन गादीवर उठून बसल्या. हवेत गारवा होता तरी त्यांना दरदरून घाम फुटला होता. गेल्या सलग तीन रात्री त्यांना हे एकच स्वप्न पडत होते. रीमा, त्यांची एकुलती एक मुलगी मुंबईला राहत होती. शिकत असताना होस्टेलवर राहायची आणि आता नोकरी लागल्यावर तिला मुंबईच्या उपनगरात ऑफिसकडून फ्लॅट मिळाला होता. नानासाहेबांनी रिटायर झाल्यावर खोपोलीला हा बंगला बांधला होता. नानासाहेब आणि वसुंधराताई खोपोलीला आरामशीर निवृत्त आयुष्य जगत होते. ऑफिसने तिला कारही दिली होती. रीमा महिन्यातून एकदा शनिवार रविवारी आई-बाबांना भेटायला खोपोलीला एक चक्कर टाकायचीच. तशी वसुंधराताईंची इच्छा असायची की प्रत्येक शनिवार रविवार तिने आपल्यासोबत घरी घालवावा परंतु रीमाच्या नोकरीमुळे, कामातील व्यग्रतेमुळे ते शक्य होत नव्हते.
रीमाने ग्रॅज्युएशननंतर जर्नालिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. गेले वर्षभर मुंबईतील एका अग्रगण्य टीव्ही चॅनेलच्या दैनंदिन बातम्यांच्या कार्यक्रमासाठी ती काही ठळक बातम्या गोळा करत होती. काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉसने बढती आणि सोबत एक आगळीवेगळी जबाबदारी तिच्या गळ्यात टाकली होती. त्यानुसार काही 'हटके' बातम्या तिला गोळा करायच्या होत्या. त्यांच्या टीव्ही चॅनेलला अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी, मंत्र-तंत्र, भुताटकी अशा थोड्याशा वेगळ्या विषयांवर एक टाइम-स्लॉट टाकायचा होता. रीमाच्या बेधडक स्वभावाची माहिती असलेल्या तिच्या बॉसला रीमाशिवाय दुसरा कोणताही वार्ताहर या कामगिरीसाठी सुचणे केवळ अशक्य होते. रीमानेही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. महिन्याभरात तिने आणि तिच्या चमूने मुंबईतील एक बंगाली बाबा आणि त्यानंतर भानामतीच्या एका प्रकरणाचा छडा लावला होता. अगदी हिरिरीने त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. स्वत: रीमाचा या बुवाबाजी, भुतेखेते, देवदेवस्कीसारख्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु त्या बंगालीबाबाचे बिंग फुटल्यावर त्याने रीमाला बरेच शिव्याशाप दिले होते आणि याचे चित्रण वसुंधराताईंनी पाहिल्यापासून त्या हवालदिल झाल्या होत्या.
रीमाला फोन करून त्यांनी परोपरीने हे काम न करण्याबाबत सुचवले होते. परंतु ऐकेल तर ती रीमा कसली? तिने निक्षून आईला सांगितले होते की हे काम तिला मनापासून आवडते आणि ती ते करत राहणार. बहुधा त्याचा परिपाक वसुंधराताईंना या स्वप्नांत दिसत होता. सकाळ झाल्यावर आधी रीमाला फोन लावायचा असे ठरवून त्या पुन्हा गादीवर पडल्या.
----
सकाळी आठ वाजता त्यांनी रीमाच्या मोबाईलफोनचा क्रमांक फिरवला. "ए आई! काय गं इतक्या सकाळी फोन करत्येस? जाम घाईत आहे मी. उशीरच झाला होता निघायला," पलीकडून रीमाचा आवाज आला. "काही नाही गं! सहजच फोन केला." वसुंधराताई उद्गारल्या. "हम्म! म्हणजे नक्की काहीतरी खास कारण असणार," आपल्या आईची सवय जाणून रीमा हसत म्हणाली. आईच्या या सहज फोन करण्याची आता तिला सवय झाली होती. कधीतरी चांगले स्थळ आले म्हणून, कधीतरी मुंबईला गडबड उडाली म्हणून तर गेल्या महिन्यापासून स्वीकारलेल्या या नव्या जबाबदारीची काळजी वाटते म्हणून वसुंधराताई बरेचदा वेळीअवेळी 'सहजच' फोन करायच्या.
"हे कारमध्ये मोबाईलवर बोलणे जमत नाही अद्याप मला, लक्ष ड्रायव्हिंगवर राहत नाही पण सांग का फोन केलास ते?" रीमाने आईला सांगितले.
"मला ना गेले काही दिवस एकच स्वप्न पडतंय रीमा आणि त्याने मला अस्वस्थ करून टाकलंय."
"कुठलं स्वप्न?" रीमाने कुतूहलाने विचारले.वसुंधराताईंनी स्वप्नाची इत्थंभूत माहिती रीमाला दिली. रीमाने शांतपणे ती ऐकून घेतली. आपली आई देवाधर्मावर विश्वास ठेवणारी असली तरी अशा फुटकळ स्वप्नांवर विश्वास ठेवणारी नाही हे ती जाणून होती. बहुतेक लागोपाठ पडलेल्या एकाच स्वप्नाने आईला बेचैन केले असेल हे तिला जाणवले.
"हे बघ आई! मन बेचैन असलं ना की अशी स्वप्न पडतात बरेचदा. स्वप्न आणि सत्य यांच्यामध्ये बरेच दरवाजे असतात. मानवी मनाला सत्यातून स्वप्नापर्यंतच्या वाटेवर लागणार्या या दरवाजांना अजून उघडणे जमलेले नाही. या बंद दरवाज्यांमागे काय आहे न जाणता उगीच एखाद्या घटनेला अद्भुताचे विशेषण लावणे बरोबर नाही. अंधश्रद्धा या अशाच जन्माला येतात." समजावणीच्या सुरात रीमाने म्हटले.
"पुन्हा बंद दरवाजाचा विषय नको बाई," आपल्या स्वप्नाची आठवण येऊन वसुंधराताई म्हणाल्या,"पण मला सांग हे स्वप्न, सत्याचे दरवाजे वगैरे नवीनच कुठेतरी वाचलेलं दिसतंय."
"हो, हो नवीनच. हल्ली मानसशास्त्रावरील बर्याच पुस्तकांचा फडशा पाडत असते त्यातच कोठेतरी मिळालं," रीमा उत्साहाने फसफसून बोलत होती.
"हम्म! रीमा या मानसशास्त्राचं आणि मानसशास्त्रज्ञांचंही काही खरं नसतं बघ. ते सर्व जगाला आपले क्लायंट्स मानतात की काय कोण जाणे," लेक सुखरूप आहे याची खात्री पटल्यावर वसुंधराताई जरा मोकळेपणाने म्हणाल्या.
"अगं आई यापुढे आम्हाला जादूटोणे, मंत्र-तंत्र, काळी जादू, अघोर विधी असे काहीसे करणार्या काही व्यक्तींवर एक कार्यक्रम करायचा आहे" रीमा पुन्हा उत्साहाने सांगू लागली.क्षणभरापूर्वी अनुभवलेला मोकळेपणा वसुंधराताईंना पुन्हा दगा देऊन गेला.
"रीमा, कशाला या गोष्टींच्या मागे लागतेस? तू तुझ्या बॉसना सांगून बदली करून घेऊ शकत नाहीस का? हे असलं काहीतरी नसतं लचांड मागे का लावून घेतेस बाई? तो बंगाली बाबा कसं काहीबाही बोलत सुटला होता माहित्ये ना, उगीच कोणाचे शाप नको लागायला मागे. सोड हे सगळं."
रीमाला आईचे बोलणे ऐकून थोडीशी गंमत वाटली पण आईच्या आवाजातली काळजी पाहून तिने हळूच म्हटले,"आई, नको अशी अंधश्रद्धा बाळगू. काहीही होणार नाही. या असल्या भोंदूबाबांचे शाप कुठले आल्येत भोवायला? अशा अंधश्रद्धांच्या भीतीच्या पगड्यातून लोकांची सुटका झालीच पाहिजे. मी, आमचे चॅनेल, माझी टीम जे काम करतो आहोत ना ते समाजाच्या चांगल्यासाठीच आहे. आमचं काहीही वाईट होणार नाही. ऑफिस आलंच माझं, बंद करते आता फोन. तू अजिबात काळजी करू नकोस. निर्धास्त झोपत जा नाहीतर बाबांनाच सांगते तुझ्या स्वप्नांबद्दल."
"नको नको, त्यांना सांगू नकोस. ते उगीच माझी रेवडी उडवतील. चल, काळजी घे आणि येत्या शनिवारी जमल्यास ये गं राहायला, तुला पाहावंस वाटतंय!" असं म्हणून वसुंधराताईंनी फोन बंद केला. लेकीशी बोलल्यावर त्यांना मनापासून बरं वाटलं.
----
पुढचा संपूर्ण आठवडा वसुंधराताईंना कोणतेही स्वप्न पडले नाही. रोज रात्री त्यांना शांत झोप लागत होती.
दर शुक्रवारी रात्री १० वाजता रीमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. मनात धाकधूक ठेवूनच त्या टीव्ही सुरू करत परंतु गेले काही आठवडे विशेष घडले नव्हते. आजही रीमाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या आणि नानासाहेब रात्रीची जेवणे झाल्यावर दिवाणखान्यात काहीतरी वाचत बसले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी टीव्ही सुरू केला. आजचा कार्यक्रम अघोर विधी आणि पूजांबाबत होता. त्यासाठी रीमा आणि तिचा चमू मुंबईला लागून असलेल्या कान्हेरी जवळच्या जंगलात गेले होते. तेथील एका आड गुंफेत अघोर पंथाचे विधी चालतात आणि अमावास्येच्या रात्री काही विशेष पूजा तेथे केल्या जातात असा त्यांना सुगावा लागला होता.कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा कान्हेरीतील एका पायवाटेवर कॅमेर्यासमोर रीमा आपले छोटेखानी भाषण देत होती.
"या जगात कोणीही अश्रद्ध नाही. प्रत्येक माणूस सश्रद्धच असतो. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात, त्याची खोली वेगळी असते, आयाम वेगळे असतात. एखादा माणूस देवावर अजिबात श्रद्धा ठेवत नसेल परंतु आपल्या आईवडिलांवर श्रद्धा बाळगून असेल, तर एखादा आपल्या कामावर श्रद्धा बाळगून असेल, गुरुवर, कलेवर, अभ्यासावर. माणसाच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. ज्या श्रद्धांवर आपला विश्वास नाही त्याला आपण अंधश्रद्धेचे नाव देतो. एखादी विद्या, शास्त्र पुरातन आहे, आज तिचे महत्त्व उरले नसेल किंवा कमी झाले असेल म्हणजे ते थोतांड असेलच असे नाही. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, एखाद्या प्राण्याला किंबहुना कुत्र्याला माणसाच्या शरीराचा, त्याने वापरलेल्या वस्तूचा, हातरुमाल किंवा चपला यांचा अचूक वास येतो. त्यावरून तो हरवलेली गोष्ट, जागा, माणूस हुडकून काढू शकतो. समजा घ्राणेंद्रिय जागृत करण्याची ही कला किंवा ज्याला सिद्धी असे म्हणू माणसाने अवगत केली तर केवळ एखाद्याच्या हातरुमालाचा, केसांच्या पुंजक्याच्या आणि अशा इतर लहानसहान गोष्टींवरून कदाचित इतरांचे स्वभाववर्णन करता येईल, त्या माणसाबद्दल बरेच काही सांगता येईल. तंत्रसाधनेतून अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात असे काही तज्ज्ञांचे मत आहे, जे इतर वेळेस भोंदूबाबांकडून चमत्कार, सिद्धी, जादू म्हणून खपवले जाते. हे करणी, नवस, जादूटोणा कुठेतरी याच विचारांशी संलग्न आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अघोरींना भेट देत आहोत. अघोर म्हणजे रक्त पिणारे, बळी देणारे, मृत व्यक्तीचे मांसभक्षण करणारे असा सर्वसाधारण समज असतो परंतु अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.
तरीही आजच्या या युगात अशा शक्तींच्या मागे लागलेल्या व्यक्तींना या साधनेची काहीही माहिती नसते आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारे ते आपली शक्ती व्यर्थ घालवतात याचे आम्ही आज चित्रण करणार आहोत.”
रीमाचे भाषण ऐकून वसुंधराताईंना शिसारी आली. “अहो, यावेळी तुम्हीच तिला सांगा की ही असली कामं करू नकोस म्हणून. कुठे जाते ही पोरगी रात्रीबेरात्री या आडरानात. हे सर्व पुरे झालं आता.”
“गप गं! तिची आख्खी टीम आहे तिच्याबरोबर. उगीच काळजी करत बसतेस. काही होत नाही. साध्या वेषातले दोन पोलिसही असतात बरोबर म्हणून सांगत होती मागे ती.” नानासाहेब उद्गारले.
“तुमचीच फूस आहे तिला. सोन्यासारखी एकुलती एक मुलगी, तिला काही होऊ नये एवढीच माझी इच्छा,” वसुंधराताईंच्या आवाजात काळजी भरली होती, त्यांनी आपले लक्ष पुन्हा टीव्हीकडे वळवले.
रीमा आणि तिचे सहकारी पूजेच्या ठिकाणी पोहोचले होते. समोरचे दृश्य पाहून वसुंधराताईंना मळमळून आले. जटा वाढवलेले आणि अंगाला भस्माचे पट्टे लावलेले काही साधू धीरगंभीर आवाजात काही मंत्रोच्चार करत होते, आजूबाजूला कोंबड्यांच्या रक्ताचा सडा पडला होता. जमिनीत त्रिशूळ खोचलेले होते, भिंतींवर मशाली पेटवल्या होत्या. जवळच कालीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. रीमा आणि तिचे सहकारी कार्यक्रमाचे चित्रण करत होते. अचानक कॅमेरा हालल्यासारखा वाटला आणि सोबत काहीजणांचे चढवलेले आवाज.
“यहाँ आना मना है। चले जाव वरना नतीजा अच्छा नहीं होगा।"
“हम ये विधियाँ लोगोंतक पहुँचा रहे हैं। यही हमारा काम है, क्यों नहीं कर सकते?”
आपापसातील बाचाबाची वाढत चालली होती. कॅमेर्याशी हिसकाहिसकी सुरू होती. इतक्यात पन्नाशीच्या आसपासचा एक जटाधारी साधू कॅमेर्यासमोर येऊन उभा राहिला, त्याच्या घार्या डोळ्यात खुनशी भाव होते. त्याने रीमाकडे नजर रोखली आणि थंड आवाजात तो म्हणाला, “लडकी यहाँ से निकल। यहाँ आकर बहुत बडी गलती कर दी। इस साधनाको आप लोगोंने खंडित किया, नतीजा तो भुगतनाही पडेगा।"
“लेकिन यहाँ आना मना है ऐसे तो कहीं नहीं लिखा?” रीमाने त्याची रेवडी उडवण्याचा प्रयत्न केला.
“जुबान नहीं लडाना, ये मेरी आँखे याद रखना, आखीरतक तुम्हारे पीछे आएगी। बहोत वक्त नहीं देंगी। तोड दो इनका सामान।" मागे वळून त्याने इतरांना सूचना दिली आणि तो ताडताड निघून गेला. त्याच्या त्या थंडपणात एक प्रकारचा खुनशीपणा होता. वसुंधराताईंच्या सर्वांगावर शहारे आले.
यानंतर स्टुडियोतून झालेल्या प्रकाराचे वर्णन करण्यात आले परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत वसुंधराताई नव्हत्या. त्यांनी चटकन रीमाला फोन लावला.
“रीमा, बेटा हे काय चाललंय? कुठे आहेस तू? कशी आहेस?”“बरी आहे गं आई,” आईने कार्यक्रम पाहिला असावा हे जाणून रीमा म्हणाली.
“घरात आहे, टीव्हीसमोरच. कार्यक्रम अमावास्येच्या रात्री चित्रित झाला ना! दोन दिवसांपूर्वी. लाइव टेलेकास्ट नाहीये. काळजी करू नकोस.”
“ते काही नाही! तू नीघ आत्ता. असशील तशी इथे ये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवं,”रडवेल्या होऊन वसुंधराताई म्हणाल्या.
“रात्रीचे साडे दहा वाजायला आले आहेत आई. आता कुठे निघू म्हणतेस. ऑफिसात उद्या कामही आहे. पुढच्या आठवड्यात येते, काळजी नको गं करूस.”
“नाही, ते काही नाही. आत्ताच नीघ, मी नाही धीर धरू शकत उद्या सकाळपर्यंत. खोपोली काही लांब नाही, रात्रीच्यावेळी तासा दिडतासात पोहोचशील. उद्याचा काय भरवसा, तू नवीन कारणे देशील, टाळशील. तुला कधी बघते असं झालंय,” वसुंधराताईंना हुंदका आवरला नाही.
नानासाहेबांनी त्यांच्या हातातून फोन घेतला. “रीमा, तुला शक्य आहे का यायला?” शांतपणे त्यांनी विचारले. "उद्या सकाळीच नीघ. इतक्या रात्री नको. आई जरा जास्तच हळवी झालीये, तिचं ब्लडप्रेशर वाढलंय असं वाटतंय. मी बघतो तिच्याकडे पण उद्या आलीस तर मलाही बरं वाटेल."
"बाबा, आता तुम्हीही? ठीक आहे. मी उद्या घरी येते.”
"पण तुझं काम?"
"आई जरा जास्तच काळजीत दिसत्ये, कसही करून कोणत्याही परिस्थितीत मी येतेच. "रीमाने वचन दिले तसा नानासाहेबांनी फोन ठेवून दिला.
----
रीमा जागेवरून उठली, आईच्या रडण्याने ती पुरी बेचैन झाली होती. आताच जावं का? बारा साडेबारा वाजेपर्यंत पोहोचता येईल. आई बाबांची बर्याच दिवसांत भेटही नाही. तिच्या चमूला एक दिवस तिच्या गैरहजेरीत काम पाहणे अशक्य नव्हते. उद्या सकाळी फोनवरून त्यांना कळवता येईल असा विचार करतानाच तिने कपडे बदलले, पर्स उचलली आणि दरवाजा लॉक करून ती गाडीपाशी आली. रात्रपाळीची गस्त घालणारा गुरखा आपल्याकडे नजर रोखून बघतो आहे असे तिला वाटले. तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. “सलाम मेमशाब!” म्हणून गुरखा निघून गेला. रीमाने स्मितहास्य करून मान झटकली आणि कार सुरू केली.
बिल्डिंगच्या बाहेर गाडी काढली तशी वळणावरचा भिकारी झटकन उठून उभा राहिला. आपल्याकडे तो डोळे फाडून बघतो आहे असे रीमाला वाटले पण नंतर लक्षात आले की बहुधा त्याची जागेवरून उठायची आणि परतायची वेळ झाली असावी. स्वत:शीच हसून तिने गाडी हमरस्त्यावर नेली. मुंबईचे रस्ते साडे १० वाजले तरी तुडुंब भरलेले. सिग्नलला गाडी थांबवली तशी ट्रॅफिक हवालदार आपल्याकडे जळजळीत नजरेने बघतो आहे असे तिला वाटले, नजर फिरवली तशी बाजूच्या गाडीतील चालक टक लावून तिला पाहत होता. 'हे काय चाललंय? मी घाबरले आहे की भास होताहेत?' तिने क्षणभर डोळे मिटले. पाठच्या गाडीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजला तसे हिरवा दिवा पडल्याचे तिच्या लक्षात आले.
"भित्यापाठी ब्रह्मराक्षस!” तिने आपल्या मनाला बजावले. गाडी आता हायवेला लागली होती. दिवसाच्या मानाने रहदारी तुरळक होती. बाहेर थोडं वारं सुटलं होतं. चंद्राची कोर ढगांशी लपंडाव खेळत होती. अंधार नेहमीपेक्षा जास्तच गडद असावा की काय कोणास ठाऊक, क्षितिजावर मध्येच एखादी वीज चमकत होती. हळूहळू पावसाचे थेंब काचेवर पडायला सुरुवात झाली. वायपरच्या मंद पार्श्वसंगीतावर रीमा गाडी हाकत होती. 'मागच्या ट्रकचे दिवे जरा जास्तच प्रखर आहेत का?' असा विचार तिच्या मनात आला. “ह्यॅ॒! आज फारच शंका येताहेत मनात बुवा. या मातोश्रींनी स्वत:बरोबर मलाही घोर लावला.”
आता बरेच अंतर कापले होते. रिमझिम पाऊस पडतच होता. मागच्या गाडीच्या प्रखर दिव्यांचा अजूनही तिला त्रास होत होता. मध्येच मागची गाडी फार जवळ आली की काय असा तिला वाटून गेले. चक्ककन प्रकाश तिच्या डोळ्यात गेला आणि क्षणभर तिला गाडीवरील ताबा सुटल्यासारखे वाटले. 'हम्म! किती घाई झालीये याला. ओवरटेक करून जा की, कशाला छळतोय मला!' रीमा स्वत:शीच पुटपुटली आणि त्या मागच्या ट्रकने बाजूने निघून जावे म्हणून तिने गाडी हळू केली, मागचा ट्रक आता फारच जवळ आला होता.
---
रात्रीचे बारा वाजून गेले होते. पाऊस आता जोमाने कोसळत होता. रीमाने गाडी घराकडे जाणार्या रस्त्यावर घेतली. तो ट्रकवाला अजूनही तिच्या मागेच होता. तिला थोडेसे विचित्र वाटले. 'हा माझा पाठलाग तर नाही ना करत?' पावसाने आता जोर धरला होता. घरापाशी जाणार्या गल्लीत तिने गाडी वळवली तरी तो ट्रक तिला मागेमागेच असल्यासारखा वाटला. तिने घाईघाईत गाडी बंगल्यात घेतली आणि ती उतरून धावतच दारापाशी आली आणि तिने दोन चारवेळा बेल दाबली. आतून काही चाहूल लागली नाही तशी तिने आईच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. 'आई! दार उघड. मी आल्येय. लवकर ये. दार उघड प्लीज!!'
दरवाजाशी काहीतरी चाहूल लागली असे वाटून वसुंधराताई उठल्या आणि दरवाजापाशी गेल्या. त्यांचा हात कडीवर गेला पण त्यांनी दरवाजा उघडला नाही, बंद दारावर आपले डोके टेकवले आणि त्या लहान मुलासारख्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. रीमा बाहेरून जिवाच्या आकांताने आईला हाका मारत होती."मी आल्येय आई! तुम्हाला सांगितलं होतं ना की येईन. दार उघड, मला आत घे प्लीज!"
आतमध्ये नानासाहेब थरथरत्या हाताने अजूनही पोलिसांशी बोलत होते. पंधरा वीस मिनिटांपूर्वी त्यांना फोन आला होता. खोपोलीजवळच रीमाचा अपघात झाला होता. मागून येणार्या भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघात मोठा होता, रीमाचा जागीच मृत्यू झाला असावा. कारमध्ये रीमाच्या डायरीत घरचा पत्ता सापडला आणि तो वाचून पोलिसांनी लगोलग नानासाहेबांना फोन केला होता.
(समाप्त)